या कार उत्पादन कंपनीने आपल्या दोन गाड्या केल्या बंद
या दोन कारचे उत्पादन बंद झालं असले तरी या गाड्या वापरणाऱ्यांना विक्रीनंतरच्या सर्व सेवा पूर्वीप्रमाणेच मिळणार आहेत
मुंबई : काही कार कंपन्यांनी आपल्या कारमध्ये दोष आठल्याने माघारी बोलावल्या होत्या. मात्र, टाटा मोटर्सने दोन गाड्यांची मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या कार आता रस्त्यावर धावताना दिसणार नाही. तर जुन्याच कार नजरेला पडतील. दरम्यान, या दोन कारचे उत्पादन बंद झालं असले तरी या गाड्या वापरणाऱ्यांना विक्रीनंतरच्या सर्व सेवा पूर्वीप्रमाणेच मिळणार आहेत, असे कंपनीतर्फे सांगण्यात आलेय.
टाटा मोटर्सने मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर कारची निर्मिती केली होती. त्यामुळे या कार देशातील ग्राहकांची पहिली पसंती ठरल्या होत्या. टाटाने इंडिका आणि इंडिगो या नव्या कार बाजारात आणल्या. त्यांना मागणीही वाढली होती. मात्र, सध्या बाजारात नव नवीन कार येत आहेत. त्यामुळे सध्या या कारना बाजारात मागणी नसल्याने 'इंडिका' आणि 'इंडिगो' या गाड्यांचं उत्पादन टाटा मोटर्सनं बंद केलेय. बाजारातील प्रचंड स्पर्धा आणि कमी झालेली विक्री या कारणांमुळे 'टाटा'नं हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रसिद्ध झालेल्या 'एसआयएएम'च्या आकडेवारीनुसार, मार्च २०१८पर्यंत 'इंडिका'चे २,५८३ तर 'इंडिगो'चे १,७५६ युनिट्स विकले गेले आहेत. मागील काही वर्षांच्या तुलनेत हा खप अत्यंत कमी आहे. त्यामुळंच एप्रिलपासून या गाड्यांचं उत्पादन थांबवण्यात आले आहे.